Tuesday, September 3, 2013

शिवरायांचा'तिसरा डोळा'

हेरगिरीचा धांडोळा : शिवरायांचा'तिसरा डोळा'

सुरतची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्दन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारी समोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले.. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले.. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्येअशा रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.

महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रीपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धांत कौटिल्य मांडतो.
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्याद्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते.
शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय नि:संशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.
बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्य़ांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्य़ांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपटय़ा आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडेदेखीलजाते.
शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासूनजनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती.). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इ. तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही.).
शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मुघलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.
बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटी दरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
आग्य््रााहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्याक्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.
शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.
बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखातदेखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्थंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनीदेखीलत्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.
इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक’.
गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळातदेखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पध्र्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.
बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.
जेम्स बाँड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.
जेम्स बाँड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !
बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.
बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्दन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणाऱ्या हेन्री ओग्झेन्दनचा हा भाऊ). पण तेसुद्धा केव्हा तर सुरतची लूट चालू असताना आणि तो वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा..! महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारी समोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.
२१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशीआहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!

Friday, July 12, 2013

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु



निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

मनुची, निकोलाव (१६३९-१७१७).



मनुची, निकोलाव (१६३९-१७१७).

सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून परागंदा होऊन तो लॉर्ड बेलोमाँट या इंग्रज सरदाराबरोबर तुर्कस्थान, इराणमधून १६५६ साली भारतात सुरत या ठिकाणी आला. नंतर त्याने मोगल बादशाह शाहजहान याचा मोठा मुलगा दारा शुकोव्ह याच्या तोफखान्यात नोकरी धरली. औरंगजेब व शाह आलम यांच्या पदरीही त्याने काही काळ नोकरी केली. या काळात शिपाईगिरी, वैद्यकीय व्यवसाय व राजनैतिक शिष्टाई इ. विविध प्रकारची त्याने कामे केली .पुढे मोगलांच्या युध्दमोहिमांबरोबर तो दक्षिण हिंदुस्थान, राजस्थान, दक्षिण हैदराबाद इ. प्रदेशात गेला. अशा एका मोहिमेत इ.स. १६६५ मध्ये पुरंदर किल्ल्याच्या परिसरात मिर्झाराजा जयसिंहबरोबर तो असताना जयसिंहच्या छावणीत त्याची शिवाजी महाराजांशी भेट झाली होती. त्याला फार्सी व उर्दू भाषांचे तसेच मोगल दरबारातील रीतिरिवाजांचे चांगले ज्ञान होते. भारतातील पोर्तुगीजांच्या वतीने त्याने छत्रपती संभाजीमहाराज व शाह आलम यांकडे शिष्टाई केली होती. उच्च शिक्षणाचा अभाव असूनही मर्यादित वैद्यकीय ज्ञानावर त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू करून अंगाच्या हुशारीने त्यात चांगले यश मिळविले व द्रव्यसंचयही केला. या व्यवसायामुळे त्याचा देशभर संचार झाला. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीच्या वेळी मोगलांच्या कारवायांनकंटाळून तो मद्रास येथे स्थायिक झाला. या सुमारास एलिझाबेथ क्लार्क या विधवेशी त्याने विवाह केला (२८ ऑक्टोबर १६८६) त्यांना एक मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्याची पत्नी १७०६ मध्ये वारली. तेव्हा त्याने आपले वास्तव्य पाँडिचेरीत हलविले, पण अखेरच्या दिवसांत तो पुन्हा मद्रासला आला असावा. कारण मद्रासच्या गव्हर्नरने टॉमस क्लार्कची सर्व संपत्ती त्यास देऊन त्याचा सन्मान केला (१४ जानेवारी १७१२). त्यानंतर तो अखेपर्यत तिथेच असावा.


मद्रासमधील वास्तव्यात (१६८६-१७०६) त्याने आपल्या बहुविध आठवणी फ्रेंच व पोर्तुगीज भाषांत लिहून काढल्या आणि चार विभागांत प्रसिध्द करण्यासाठी त्या पॅरिसला पाठविल्या. या आठवणीत त्याने शिवाजीसह तत्कालीन प्रसिध्द राज्यकर्ते .सेनानी यांची अस्सल प्रसंगचित्रे काढून घेतली होती. त्याला औरंगजेब, पोर्तुगीज आणि जेझुइट यांच्याबद्दल तिटकारा होता. भारतातील शहरी वैभव व ग्रामीण दारिद्र्य यांचे त्याने उत्तम चित्रण केले आहे. धार्मिक बाबीविषयी तो पाल्हाळिक असून वास्तव व काल्पनिकांचे मिश्रण त्याच्या लेखनात आढळते. काही अपवाद वगळता त्याच्या ग्रंथातील स्थल-कालाचे तपशील आणि विधाने ऐतिहासिक दृष्ट्या सामान्यतः विश्वसनीय वाटतात. त्याच्या आठवणींचे पहिले इंग्रजी भाषांतर विल्यम आयर्विन याने स्तोरिआ दो मोगोर या नावाने १९०७ मध्ये प्रकाशित केले. त्याची दुसरी आवृत्ती १९८१ मध्ये प्रसिध्द झाली. मराठीत असे होते मोगल या शीर्षकाने ज.स. चौंबळ यांनी त्याचे भाषांतर केले आहे (१९७४) मोगल काळ आणि मराठ्यांचा इतिहास यांची माहिती देणारा एक उपयुक्त साधनग्रंथ म्हणून मनुचीच्या या आठवणीस आगळे महत्व प्राप्त झाले.

मन हे वेडं असतं



मन हे वेडं असतं
एखादी व्यक्ती आवडली
कि तिच्यावर प्रेम करून बसतं
पण.... मला हे कळत नाही
प्रेम का होतं?
... डोळ्यांतून नेहमी
अश्रू वाहण्यासाठी कि,
हृदयाला सतत
वेदना देण्यासाठी
प्रेम का होतं?
त्या व्यक्तीच्या विरहाने
जीवनाचं रान होण्यासाठी कि,
त्याच व्यक्तीच्या सहवासाने
जीवनात पालवी फुलवण्यासाठी
प्रेम का होतं?
जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत
तिच्या आठवणीने
प्रेमपथावर एकटं चालण्यासाठी कि,
तिच्या सोबतीने नवीन
आयुष्याच्या सूर्योदयाबरोबर
जीवनाची पहाट सजवण्यासाठी
प्रेम का होतं?
कोणी म्हणतं
प्रेम हि जीवनातील
कठोर परीक्षा आहे आणि
त्या परीक्षेत सर्वच
उत्तीर्ण होत नाहीत
मग मला हे कळत नाही
प्रेम का होतं? ? ?

!!..विठ्ठल..!!


!!..विठ्ठल..!!

विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन...

तोच भासे दाता तोची माता-पिता
विसर जगाचा सर्वकाळ...

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिँता व्यथा क्षणार्धात...

सोड अंहकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठल डोळे मिटून..!!

हीच व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको न दे हरी ॥

Tuesday, December 25, 2012

किल्ले वासोटा



 वासोटा (Vasota) किल्ल्याची ऊंची :
4267
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील,
कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड
अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले
वासोटा’. ज्ञानेश्वरीत
वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’
असा दिला आहे. वासोट्यालाच
’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम
बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध
बनला आहे..
Vasota
इतिहास :
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध
घेता आपल्याला वसिष्ठ
ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल.
असे मानले जाते की, वसिष्ठ
ऋषींचा एक शिष्य,
अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत
ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला,
सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर
राहण्यास आला व त्याने
आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे
नाव दिले. कालांतराने
या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे
साज चढवून लष्करी ठाणे केले.
त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे
नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.
प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही,
हा किल्ला शिलाहारकालीन
असावा.
शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत
’वसंतगड’ या नावाने
उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा.
मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून
शिवरायांनी जावळी विजयानंतर
वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण
ते खरे नाही जावळी घेताना,
जावळीतील तसेच कोकणातील इतर
किल्ले शिवरायांनी घेतले. पण
वासोटा दूर असल्याने
किल्लेदाराच्या हाती राहीला.
अफझल वधानंतर
काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत
नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर
अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत
मावळातील पायदळ पाठवून
त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून
१६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये
पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व
सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत
ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये
वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये
सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये
पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई
तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात
घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे
सेनापती बापू गोखले यांनी ताई
तेलिणी बरोबर लढाई केली. ताई
तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज
देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये
वासोटा किल्ला बापू
गोखल्यांच्या हाती पडला.
पहाण्याची ठिकाणे :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात.
यातील
पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत
आहे. दुसर्य़ा दरवाजाने गडावर प्रवेश
करता येतो. समोरच मारुतीचं बिन
छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख
तीन वाटा जातात. सरळ
जाणारी वाट किल्ल्यावरील
भग्नावशेषांकडे घेऊन जाते.
उजव्या बाजूस जाणारी वाट
’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच
महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात
दोन ते तीन जणांची राहण्याची सोय
होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट
माचीवर घेऊन जाते.
या माचीला पाहून
लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते.
या माचीलाच काळकाईचे ठाणे
म्हणतात. या माचीवरून
दिसणारा आजुबाजूचा घनदाट
झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव,
रसाळ, सुमार, महिपतगड,
कोयनेचा जलाशय हा संपूर्ण
देखावा मोठा रमणीय आहे.
मारुतीच्या देवळाच्या डावीकडे
जाणारी वाट आपल्याला जोड
टाक्यांपाशी घेऊन जाते.
या टाक्यातील
पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे
ही वाट जंगलात शिरते
आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.
या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’
अक्षरा सारखा आहे. याला पाहून
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण
येते. समोरच उभा असणारा आणि आपले
लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच
‘जुना वासोटा’ होय.
जुना वासोटा
नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे
राहिल्यावर समोरच
उभा असणारा डोंगर म्हणजे
जुना वासोटा. आता या गडावर
जाणारी वाट अस्तित्वात नाही.
तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट
झाडे व वन्यश्वापदेही असल्याने
सहसा येथे कोणी जात नाही.
पोहोचण्याच्या वाटा :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत.
एक सातारामार्गे आणि दुसरा थेट
नागेश्वर मार्गे वासोट्याकडे
१) सातारामार्गे वासोटा :- खालील
तिनही मार्गाने जातांना प्रथम
कोयना धरणाचा " शिवसागर जलाशय
" बोटीने पार करावा लागतो.
अ) कुसापूर मार्गे :-
सातार्याहून
बामणोली या गावी यावे. सकाळी ९
वाजता सातार्याहून बसची सोय आहे.
येथून
कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय
लाँचने पार करून जाता येते. कुसापूरहून
दाट जंगलात दोन वाटा जातात.
उजवीकडे जाणारी वाट आठ
मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर
डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर
घेऊन जाते.
ब) खिरकंडी मार्गे:-
सातार्याहून बसने ’वाघाली देवाची’
या गावी यावे. येथून
लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून
खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर
वाडी पासून जाणारी वाट ’मेट
इंदवली’ या गावात घेऊन जाते.
सातार्याहून इथवरचा प्रवास आठ- नऊ
तासांचा आहे. येथून पुढे पाच -
सहा तासात वासोट्यावर जाता येते.
क) महाबळेश्वर मार्गे :-
महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन
लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून
(अ) मध्ये सांगितलेल्या रस्त्याने
वासोटा गाठावे.
२) चिपळूणहून वासोटा :-
ड) चिपळूणहून सकाळी ८.३०
वाजताच्या बसने ‘चोरवणे’
या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात
वासोट्याला पोहोचता येते. या मार्गात
वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे
आपल्याकडे पाण्याचा भरपूर
साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर
एक पठार लागते. पठारावरून डावीकडे
जाणारी वाट नागेश्वरकडे तर
उजवीकडची वाट वासोट्याला जाते.
येथे नागेश्वराकडे जाणार्य़ा वाटेने थोडे
पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात
विहिरीकडे जाते. येथून वासोट्याचे
अंतर दोन तासात कापता येते.
ई) चिपळूणहून ‘तिवरे’ या गावी यावे,
येथून रेडे घाटाने
वासोट्याला जाता येते.
फ) नागेश्वरमार्गे वासोटा :-
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय
वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत
नाही. वासोट्यावर जाताना समोरच
एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो,
त्यालाच नागेश्वर म्हणतात.
या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून,
तेथे महादेवाचे मंदिर आहे.
हजारो नागरिक दर
शिवरात्रीला या पवित्र
स्थानी दर्शनास येतात.
गुहेच्या छतावरून बाराही महिने
पाण्याच्या थेंबांचा अभिषेक
शिवलिंगावर होत असतो. बहुतेक
ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग
वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त
लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.
राहाण्याची सोय :
१)
पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोट्यावरील
महादेवाच्या मंदिरात २ ते ३
जणांची राहण्याची सोय होते.
२) नव्या वासोट्यावर जोड
टाक्यांच्या शेजारील
पठारावरही राहता येते.
३)
नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम
जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात
राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वतच करावी
पाण्याची सोय :
नागेश्वराच्या गुहेकडे जातांना,
पायर्य़ांच्या उजवीकडून जंगलात
जाणारी वाट
पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन
जाते. नव्या वासोट्यावरही मुबलक
प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.
उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कुसापूर मार्गे ४ तास लागतात , चोरवणे
मार्गे ७ तास लागतात.
सूचना :
१) वासोट्याला पावसाळ्यात
जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर
त्रास होतो, तेव्हा आवश्यक
ती काळजी घ्यावी,
२) चिपळूणहून चोरवणे मार्गे
वासोट्याला जाताना वाटेत
पाण्याची कुठेही सोय नाही,
तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ
बाळगणे आवश्यक आहे,

Friday, December 21, 2012

संत तुकाराम




संत तुकाराम
हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी'जगद्‌गुरु'म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी -'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय'असा जयघोष करतात.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात ’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूत ी त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. जगत गुरु संत तुकाराम महाराज, हे छत्रपति शिवाजी महाराज यांचे गुरु आहेत

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्य े मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..

तुकारांमांचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले. देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण त्या बुडालेल्या गाथा तेरा दिवसांनी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वर भटांना पश्चात्ताप झाला व त्यांनी तुकारामांचे शिष्यत्व पत्करले.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो