Tuesday, December 25, 2012

किल्ले वासोटा



 वासोटा (Vasota) किल्ल्याची ऊंची :
4267
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील,
कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड
अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले
वासोटा’. ज्ञानेश्वरीत
वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’
असा दिला आहे. वासोट्यालाच
’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम
बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध
बनला आहे..
Vasota
इतिहास :
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध
घेता आपल्याला वसिष्ठ
ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल.
असे मानले जाते की, वसिष्ठ
ऋषींचा एक शिष्य,
अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत
ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला,
सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर
राहण्यास आला व त्याने
आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे
नाव दिले. कालांतराने
या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे
साज चढवून लष्करी ठाणे केले.
त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे
नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.
प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही,
हा किल्ला शिलाहारकालीन
असावा.
शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत
’वसंतगड’ या नावाने
उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा.
मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून
शिवरायांनी जावळी विजयानंतर
वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण
ते खरे नाही जावळी घेताना,
जावळीतील तसेच कोकणातील इतर
किल्ले शिवरायांनी घेतले. पण
वासोटा दूर असल्याने
किल्लेदाराच्या हाती राहीला.
अफझल वधानंतर
काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत
नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर
अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत
मावळातील पायदळ पाठवून
त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून
१६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये
पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व
सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत
ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये
वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये
सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये
पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई
तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात
घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे
सेनापती बापू गोखले यांनी ताई
तेलिणी बरोबर लढाई केली. ताई
तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज
देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये
वासोटा किल्ला बापू
गोखल्यांच्या हाती पडला.
पहाण्याची ठिकाणे :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात.
यातील
पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत
आहे. दुसर्य़ा दरवाजाने गडावर प्रवेश
करता येतो. समोरच मारुतीचं बिन
छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख
तीन वाटा जातात. सरळ
जाणारी वाट किल्ल्यावरील
भग्नावशेषांकडे घेऊन जाते.
उजव्या बाजूस जाणारी वाट
’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच
महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात
दोन ते तीन जणांची राहण्याची सोय
होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट
माचीवर घेऊन जाते.
या माचीला पाहून
लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते.
या माचीलाच काळकाईचे ठाणे
म्हणतात. या माचीवरून
दिसणारा आजुबाजूचा घनदाट
झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव,
रसाळ, सुमार, महिपतगड,
कोयनेचा जलाशय हा संपूर्ण
देखावा मोठा रमणीय आहे.
मारुतीच्या देवळाच्या डावीकडे
जाणारी वाट आपल्याला जोड
टाक्यांपाशी घेऊन जाते.
या टाक्यातील
पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे
ही वाट जंगलात शिरते
आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.
या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’
अक्षरा सारखा आहे. याला पाहून
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण
येते. समोरच उभा असणारा आणि आपले
लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच
‘जुना वासोटा’ होय.
जुना वासोटा
नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे
राहिल्यावर समोरच
उभा असणारा डोंगर म्हणजे
जुना वासोटा. आता या गडावर
जाणारी वाट अस्तित्वात नाही.
तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट
झाडे व वन्यश्वापदेही असल्याने
सहसा येथे कोणी जात नाही.
पोहोचण्याच्या वाटा :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत.
एक सातारामार्गे आणि दुसरा थेट
नागेश्वर मार्गे वासोट्याकडे
१) सातारामार्गे वासोटा :- खालील
तिनही मार्गाने जातांना प्रथम
कोयना धरणाचा " शिवसागर जलाशय
" बोटीने पार करावा लागतो.
अ) कुसापूर मार्गे :-
सातार्याहून
बामणोली या गावी यावे. सकाळी ९
वाजता सातार्याहून बसची सोय आहे.
येथून
कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय
लाँचने पार करून जाता येते. कुसापूरहून
दाट जंगलात दोन वाटा जातात.
उजवीकडे जाणारी वाट आठ
मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर
डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर
घेऊन जाते.
ब) खिरकंडी मार्गे:-
सातार्याहून बसने ’वाघाली देवाची’
या गावी यावे. येथून
लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून
खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर
वाडी पासून जाणारी वाट ’मेट
इंदवली’ या गावात घेऊन जाते.
सातार्याहून इथवरचा प्रवास आठ- नऊ
तासांचा आहे. येथून पुढे पाच -
सहा तासात वासोट्यावर जाता येते.
क) महाबळेश्वर मार्गे :-
महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन
लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून
(अ) मध्ये सांगितलेल्या रस्त्याने
वासोटा गाठावे.
२) चिपळूणहून वासोटा :-
ड) चिपळूणहून सकाळी ८.३०
वाजताच्या बसने ‘चोरवणे’
या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात
वासोट्याला पोहोचता येते. या मार्गात
वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे
आपल्याकडे पाण्याचा भरपूर
साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर
एक पठार लागते. पठारावरून डावीकडे
जाणारी वाट नागेश्वरकडे तर
उजवीकडची वाट वासोट्याला जाते.
येथे नागेश्वराकडे जाणार्य़ा वाटेने थोडे
पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात
विहिरीकडे जाते. येथून वासोट्याचे
अंतर दोन तासात कापता येते.
ई) चिपळूणहून ‘तिवरे’ या गावी यावे,
येथून रेडे घाटाने
वासोट्याला जाता येते.
फ) नागेश्वरमार्गे वासोटा :-
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय
वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत
नाही. वासोट्यावर जाताना समोरच
एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो,
त्यालाच नागेश्वर म्हणतात.
या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून,
तेथे महादेवाचे मंदिर आहे.
हजारो नागरिक दर
शिवरात्रीला या पवित्र
स्थानी दर्शनास येतात.
गुहेच्या छतावरून बाराही महिने
पाण्याच्या थेंबांचा अभिषेक
शिवलिंगावर होत असतो. बहुतेक
ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग
वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त
लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.
राहाण्याची सोय :
१)
पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोट्यावरील
महादेवाच्या मंदिरात २ ते ३
जणांची राहण्याची सोय होते.
२) नव्या वासोट्यावर जोड
टाक्यांच्या शेजारील
पठारावरही राहता येते.
३)
नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम
जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात
राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वतच करावी
पाण्याची सोय :
नागेश्वराच्या गुहेकडे जातांना,
पायर्य़ांच्या उजवीकडून जंगलात
जाणारी वाट
पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन
जाते. नव्या वासोट्यावरही मुबलक
प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.
उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कुसापूर मार्गे ४ तास लागतात , चोरवणे
मार्गे ७ तास लागतात.
सूचना :
१) वासोट्याला पावसाळ्यात
जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर
त्रास होतो, तेव्हा आवश्यक
ती काळजी घ्यावी,
२) चिपळूणहून चोरवणे मार्गे
वासोट्याला जाताना वाटेत
पाण्याची कुठेही सोय नाही,
तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ
बाळगणे आवश्यक आहे,

Friday, December 21, 2012

संत तुकाराम




संत तुकाराम
हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी'जगद्‌गुरु'म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी -'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय'असा जयघोष करतात.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात ’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूत ी त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. जगत गुरु संत तुकाराम महाराज, हे छत्रपति शिवाजी महाराज यांचे गुरु आहेत

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्य े मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..

तुकारांमांचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले. देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण त्या बुडालेल्या गाथा तेरा दिवसांनी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वर भटांना पश्चात्ताप झाला व त्यांनी तुकारामांचे शिष्यत्व पत्करले.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो