Tuesday, June 5, 2012

फ़ोडुनी कोथळा छातीचा


 

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

समशेरीशी खेळ्लोय मी,
हातात भाले पाळण्यातही....
संकटांचे पहाडही मोठे,
तोडलेय मी खेळण्यातही....

दुरुनही चटका देणारा,
ताप मी जळत्या वातीचा......
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

निधडी छाती ताव मिशीवर,
फ़ेटा रुळला खांद्यावरती.....
जिथे जोडले गद्दार होते,
वार मी केले सांध्यावरती....

बाजी,दाजी,मुरारबाजी,
तान्हा,जीवा अन संताजी......
रक्त पेरले ज्या मातीवर,
त्या मातीशी नाळ माझी....

दंशण्यास शत्रुस तत्पर,
सर्प मी विलगत्या कातीचा....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

शिवसंपत्ती म्हणौन आजवर,
जपला महाराष्ट्र मीच आहे...
नजर ठेवुनी चोरण्यास हा,
शत्रुच माझा नीच आहे...

दंड ठोकुनी वेशीवरती,
रक्षिणार मी राष्ट्र सारा....
जातीपाती नाहीत जेथे,
फ़क्त प्रीतीचा असे पसारा...

जगात झेंडा उंच ज्याचा,
तोच मी मराठा ख्यातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
--- संतोष वाटपाडे

No comments:

Post a Comment